डॉ. रसाल यांची सद्गुरु कन्सल्टन्सीला सदिच्छा भेट

Image
  सातारा, दि. २४ ऑगस्ट २०२६ : Dr. Rasal’s Sunder Educational Consultancyचे डॉ. रसाल यांनी सातारा दौऱ्यादरम्यान सद्गुरु कन्सल्टन्सी, सातारा येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित MBBS विद्यार्थ्यांशी संवाद साधत परदेशातील वैद्यकीय शिक्षणाच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. विशेषतः रशियामधील MBBS शिक्षण , तेथील शैक्षणिक संधी, प्रवेश प्रक्रिया तसेच MBBS क्षेत्रातील आगामी बदल आणि महत्त्वाच्या बाबींविषयी डॉ. रसाल यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले. या कार्यक्रमास सद्गुरु कन्सल्टन्सीच्या CEO सौ. मेघा पवार , Digital Shende, Satara चे श्री. सतीश शेंडे , सौ. ज्योती शेंडे तसेच MBBS प्रवेश प्रक्रियेत सहभागी असलेले विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि परदेशातील वैद्यकीय शिक्षणाच्या संधींबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये स्पष्टता निर्माण व्हावी, या दृष्टीने हा संवाद उपयुक्त ठरला. Dr. Rasal’s Sunder Educational Consultancy ही परदेशातील MBBS शिक्...

शेणोली, कराड ची यात्रा अतिशय उत्साहात संपन्न | Karad Viral News

  

शेणोली, कराड ची यात्रा अतिशय उत्साहात संपन्न  Karad Viral News
शेणोली, कराड ची यात्रा अतिशय उत्साहात संपन्न  Karad Viral News

    सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शेणोली गाव  येथील ग्रामदैवत श्री अकलाई देवी मुळे संपूर्ण परिसरात प्रसिद्ध आहे. सांगली, सातारा तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागातून हजारो भाविक, पर्यटक आणि उत्साही नागरिक दरवर्षी या यात्रेला उपस्थित राहतात. सुमारे तीनशे वर्षांची परंपरा असलेली शेणोलीची यात्रा ही परिसरातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय यात्रांपैकी एक मानली जाते. श्रद्धा, परंपरा, सामाजिक सहभाग आणि बदलत्या काळानुसार स्वीकारलेली आधुनिकता यांचा सुंदर संगम या यात्रेत पाहायला मिळतो.

    यावर्षीची(2026) यात्रा देखील अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली असून अनेक ग्रामस्थ, भाविक, पाहुणे आणि माहेरवाशिणींनी या यात्रेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

 श्री अकलाई देवी – गावाचे ग्रामदैवत आणि श्रद्धास्थान 

       शेणोली गावचे ग्रामदैवत श्री अकलाई देवी आहे. डोंगरावर असलेले देवीचे मूळ स्थान हे भाविकांचे अत्यंत पवित्र श्रद्धास्थान मानले जाते. यात्रेच्या दिवशी हजारो भाविक या ठिकाणी जाऊन नारळ, अगरबत्ती, हळद-कुंकू वाहून देवीचे दर्शन घेतात.

         या यात्रेतील सर्वात महत्त्वाचा धार्मिक कार्यक्रम म्हणजे श्री अकलाई देवीची पालखी. पारंपारिक पद्धतीनुसार ही पालखी गावातील मारुती मंदिरातून सुरू होते. वाजत-गाजत, आणि अकलूबाई च्या नावानं चांगभलं " च्या जयघोष करत ही पालखी डोंगरावरील मूळ मंदिरात पोहोचते. तेथे पूजा-अर्चा व धार्मिक कार्यक्रम पार पडतात. त्यानंतर दुपारी साधारण दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान पालखी पुन्हा गावात परतते.गावातील मुख्य मार्गाने येऊन पुन्हा मारुती च्या मंडपात येते.या सोहळ्यात वारकरी, भाविक, मानकरी, ग्रामस्थ आणि तरुण मंडळे मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले होते .

 पारंपारिक बैलगाडा मिरवणूक – यात्रेचे मुख्य आकर्षण 

      शेणोली यात्रेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे पारंपारिक बैलगाडा मिरवणूक . अनेक वर्षांपासून ही परंपरा गावात जपली जात आहे. गावातील प्रत्येक वाडा  विशेष तयारी करून पारंपारिक लाकडी गाडा तयार करतात. या गाड्यांना पूर्वी दहा-दहा बैलांच्या जोड्या लावून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली जाते.गाडा सजविण्यासाठी मोठा खर्च केला जातो. अंदाजे प्रति गाडा ५० हजार रुपये खर्च येतो.( वाद्य / डीजे डॉल्बीसह )गाड्यांसमोर वाजत-गाजत बँड, वाद्ये आणि विविध पारंपारिक कलाप्रकार सादर केले जात असत . या मिरवणुकीमुळे यात्रेचा उत्साह अधिक वाढतो.

 परंपरेतील बदल – पारंपारिक बँड ते डीजे डॉल्बी 

      पूर्वी या मिरवणुकीमध्ये ढोल-ताशे आणि पारंपारिक बँड वापरले जात असत. नंतर काळानुसार बँड/बॅन्जो आणि आधुनिक बँड पथकांनी ही जागा घेतली.याचबरोबर या मिरवणुकीत नृत्य करणाऱ्या डोंबारी समाजातील महिला आणि मुली हे यात्रेचे आकर्षण बनले. सुरुवातीला जमिनीवर नाचणाऱ्या  नंतर ट्रॅक्टर च्या ट्रॉलीमध्ये  नृत्य करण्याची पद्धत सुरू केली. त्यामुळे यात्रेचा रंगतदारपणा आणखीनच वाढला.

      अलीकडच्या काळात या यात्रेमध्ये डीजे आणि डॉल्बी सिस्टीम मोठ्या प्रमाणात वापरली जाऊ लागली. आज अनेक गाड्यांसमोर डीजे-डॉल्बी लावले जातात. सुरुवातीला ग्रामस्थांनी या बदलाचा स्वीकार केला. मात्र मोठा आवाज आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता ज्येष्ठ नागरिक आणि महिलांकडून त्याला विरोधही झाला.

 समन्वयातून साधले समाधान 

        या वादावर मार्ग काढण्यासाठी , यात्रा कमिटी, तरुण मंडळे,ग्रामस्थ आणि प्रशासन यांनी समन्वय साधून काही नियम आणि अटी निश्चित केल्या. आवाजाची मर्यादा, वेळेचे बंधन आणि शिस्त यांचे पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या नियमांचे पालन करून यावर्षीची यात्रा अतिशय उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. त्यामुळे परंपरा आणि आधुनिकता यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न या यात्रेत दिसून आला .

 सोशल मीडियामुळे वाढलेली प्रसिद्धी 

      आजच्या डिजिटल आणि AI च्या युगात यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि रिल्स यांच्या माध्यमातून शेणोली यात्रेची प्रसिद्धी प्रचंड वाढली आहे. डीजे आणि डॉल्बी सिस्टीमचे व्हिडिओ तयार करण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागातून तसेच कर्नाटकातूनही अनेक डीजे प्रेमी, युट्युबर आणि सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर येथे आवर्जून आले .पूर्वी या यात्रेची प्रसिद्धी स्थानिक पातळीवर होती; मात्र आज सोशल मीडियामुळे तिची माहिती लाखो लोकांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे शेणोली यात्रा आता केवळ गावाची किंवा तालुक्याची मर्यादा ओलांडून व्यापक स्तरावर प्रसिद्ध झाली आहे. दोन दिवसांमध्ये सोशल मीडियावरील हा कंटेंट आणि सोशल मीडिया चेक केला असता वेगवेगळ्या भागातून लाखो लोकांनी ही यात्रा पाहिल्याचे दिसून येत आहे.

 कुस्ती परंपरेचा मान 

      शेणोली गावाला कुस्तीची देखील जुनी परंपरा लाभली आहे. गावातील अनेक नामांकित पैलवानांनी कुस्ती क्षेत्रात योगदान दिले आहे. यात्रेच्या निमित्ताने आयोजित होणाऱ्या कुस्त्यांचा फड हा यात्रेचा आणखी एक महत्त्वाचे आकर्षण ठरते .

पूर्वी नारळावर किंवा कांदे बताशे च्या पाकिटावर होणाऱ्या कुस्त्यांपासून सुरुवात झालेल्या या स्पर्धा आज हजारो-लाखो रुपयांच्या बक्षिसांसह आयोजित केल्या. सातारा - सांगली जिल्ह्यातील कुस्तीप्रेमी या मैदानावर आवर्जून उपस्थित राहतात.कुस्ती खेळणाऱ्या पैलवानांचा तसेच कुस्ती परंपरा जपणाऱ्या ज्येष्ठ पैलवानांचा यात्रा कमिटीच्या वतीने आदरपूर्वक सन्मान करण्यात आला .

 यात्रेचा आर्थिक पैलू 

शेणोली यात्रा ही धार्मिक कार्यक्रमाबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा मोठा धार्मिक व सामाजिक उत्सव म्हणून उदयास येत आहे . यात्रेमध्ये विविध प्रकारचे आर्थिक व्यवहार होतात. 

          शेणोलीच्या या  यात्रेचा  काही अभ्यासकांनी व आर्थिक संशोधकांनी अंदाजे आर्थिक उलाढालीचे आकडे हे लाखात नव्हे तर काही कोटी रुपयामध्ये जात असतात.यामुळे यात्रेच्या काळात व्यापारी, खाद्यपदार्थ विक्रेते आणि विविध सेवा क्षेत्रातील बाहेरगावच्या आणि स्थानिक लोकांना मोठा आर्थिक फायदा झालेला आहे . 

 व्यवस्थापन आणि सामाजिक शिस्त 

        एवढ्या मोठ्या यात्रेचे नियोजन करणे हे मोठे आव्हान असते. यात्रा कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य, ग्रामस्थ आणि तरुण मंडळे ही जबाबदारी अत्यंत दक्षतेने पार पाडतात.गाड्यांचे नंबर , डीजे-डॉल्बीचे नियोजन करणे, गर्दीवर नियंत्रण ठेवणे आणि कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी तरुण मंडळी सतत सतर्क असतात.यात्रेमध्ये हौसे-नवसे- गवसे अशा विविध स्वभावाचे लोक येत असतात. काही वेळा गवसे लोकांमुळे गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. अशा वेळी यात्रा कमिटी आणि ग्रामस्थ हूलटबाजी करणाऱ्या युवकांना समजावून सांगून परिस्थिती नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे यात्रा शांततेत आणि उत्साहात पार पडली .

 मनोरंजनाच्या कार्यक्रमाची विशेष मेजवानी 

      शेणोली गावची यात्रा म्हटलं की अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यामध्ये सांस्कृतिक आणि तीन दिवसाच्या कार्यक्रमाची विशेष मेजवानी ठरलेली असते. कोल्हापूरचे वैभव ऑर्केस्ट्रा हे गेले 30 वर्ष आपल्याला सेवा देत आहे . शेणोली गावाचे सहकार्य आणि प्रेम पाहून ते नेहमीच आपल्याला इतर गावाच्या तुलनेने विशेष सहकार्याची परंपरा याही वर्षी त्यांनी कायम ठेवली आहे. ऑर्केस्ट्रा तमाशा यासह सर्वच कार्यक्रमाचे आयोजन ही नेहमीच आकर्षण असते. त्याप्रमाणे चालू वर्षी सुद्धा हे आकर्षण कायम राहिले.

 प्रशासनाचे सहकार्य 

       यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी यात्रा कमिटी, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन  यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले. गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा आणि स्वच्छता यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या .

 ग्रामस्थ व पाहुण्यांकडून समाधान 

      यात्रेनिमित्त गावात आलेल्या भाविक, पाहुणे, महिला व माहेरवाशिणी यांच्याशी चर्चा केली असता यावर्षीची यात्रा अत्यंत चांगल्या वातावरणात आणि उत्साहात पार पडल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.

    पुढील वर्षांमध्येही अशीच शांततेत, उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात यात्रा पार पडावी, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.शेणोली यात्रा ही श्रद्धा, परंपरा, सामाजिक एकोपा आणि आधुनिकतेचा संगम आहे. सुमारे तीनसे वर्षांची परंपरा जपत बदलत्या काळाशी जुळवून घेत गावकऱ्यांनी या यात्रेला एक वेगळे वैशिष्ट्य निर्माण करून दिले आहे. ग्रामस्थांचे सहकार्य, तरुण मंडळांची जबाबदारी, विशेषतः यात्रा कमिटीचे ( विशेष अभिनंदन ) नियोजन आणि  पोलीस प्रशासनाचे सहकार्य यामुळे यात्रा याही वर्षी उत्साहात आणि शांततेत पार पडत असून पश्चिम महाराष्ट्रातील एक आदर्श धार्मिक-सांस्कृतिक उत्सव म्हणून शेणोली यात्रेची ओळख निर्माण झाली आहे.

Comments